खड्ड्याचा वाढदिवस साजरा करून प्रशासनाविरोधात नागरिकांचा अनोखा निषेध”
प्रभाग १ मधील मुंजाबावस्ती, धानोरी येथे दहा वर्षांपासून कायम असलेल्या खड्ड्यावर केक कापून आंदोलन
पुणे : प्रभाग क्रमांक १ मधील मुंजाबावस्ती, धानोरी परिसरात गेल्या तब्बल दहा वर्षांपासून कायम असलेल्या आणि वारंवार दुरुस्ती करूनही पुन्हा उघडणाऱ्या खड्ड्याविरोधात नागरिकांनी अनोख्या पद्धतीने संताप व्यक्त केला. या खड्ड्याचा प्रतिकात्मक “वाढदिवस” साजरा करत केक कापून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्यावरील खड्डा अनेक वेळा दुरुस्त करण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी दुरुस्ती अल्पकाळ टिकली आणि काही दिवसांतच रस्ता पुन्हा खराब झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नागरिकांचा आरोप आहे की, वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च दाखवला जातो; मात्र प्रत्यक्षात दर्जेदार काम होत नसल्याने समस्या कायम राहत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रदीप रावते फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत खड्ड्याजवळ केक आणून “दहा वर्षांचा वाढदिवस” साजरा केला. यावेळी फुगे, शुभेच्छा संदेश आणि घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्थानिकांनी सांगितले की, पावसाळ्यात या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, वाहनांचे नुकसान होते तसेच पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाय न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला.
नागरिकांची मागणी आहे की, या रस्त्याच्या दुरुस्तीवर आतापर्यंत किती निधी खर्च झाला याची चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दर्जेदार व कायमस्वरूपी काम करून नागरिकांना दिलासा द्यावा.
यावेळी दत्ता चव्हाण, संभाजी राजगे , प्रथम रावते, आनंद मोरे,आनंद रावते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“खड्डा हटवा, दिखाऊ दुरुस्ती बंद करा” अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली.

संपादक : नागेश देडे





