महानगरपालिका आयुक्तांनी कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी; दूषित पाणीपुरवठा तक्रारींवर दोन दिवसांत कारवाईचे आदेश
पुणे प्रतीनिधी ,१० जून :
पुणे शहराच्या उत्तर-पूर्व भागातील गढूळ / पिवळसर पाणी तसेच कमी दाबाने आणि अनियमित वेळेत होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी केल्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत कुरुळी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली.
नागपूरचाळ, मुंजाबा वस्ती, धानोरी परिसरातील पाणीपुरवठा समस्यांचा आढावा घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या अडचणी मांडल्या.
पाहणीदरम्यान जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया कशी केली जाते याची माहिती घेण्यात आली. गढूळ व पिवळसर पाण्याच्या तक्रारींचे पुढील दोन दिवसांत तांत्रिक तपासणीद्वारे निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार १० जून रोजी प्रत्यक्ष तपासणी होणार असून त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.
तसेच भामा-आसखेड प्रकल्पाच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्यात खंड पडू नये यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. शुद्ध पाणीपुरवठा नियमित होईपर्यंत संबंधित भागात दिवसा-आड पाणीपुरवठा नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचेही सांगण्यात आले.
या पाहणीवेळी पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संपादक : नागेश देडे





