लोहगाव–वडगाव शिंदे परिसरात अवैध गौण खनिज उत्खननाचा धुमाकूळ; 2 ते 5 हजार ब्रास स्टोनची चोरी, प्रशासन मौन
पुणे प्रतिनिधी :
लोहगाव व वडगाव शिंदे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गौण खनिज उत्खननाचे मोठे रॅकेट सर्रासपणे सुरू असून, प्रशासनाच्या नाकावर टिचून चालणाऱ्या या गैरकारभाराची नागरिकांकडून तीव्र नोंद घेण्यात येत आहे. गट क्रमांक 402, मौजे वडगाव शिंदे येथे डिफेन्स सिटी फेज 1 प्रकल्पांतर्गत परवाना नसताना आणि कोणतीही अधिकृत आदेशाविना मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या अवैध उत्खननामधून अंदाजे 2,000 ते 5,000 ब्रास स्टोन काढून तेथून बाहेर वाहतूक करण्यात आली आहे. प्रशासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय किंवा तपासणीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात खनिज बाहेर नेले जाणे हा गंभीर प्रकार मानला जात आहे.
स्फोटकांचा बेकायदेशीर वापर
लोहगाव परिसरात उत्खननासाठी क्लस्टर कटिंग, ड्रिलिंग आणि स्फोटकांचा बेकायदेशीर वापर केल्याचेही स्पष्ट झाले आहे. स्फोटके वापरण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाची आवश्यक परवानगी लागत असतानाही सदर कामासाठी कोणताही आदेश उपलब्ध नसल्याची पुष्टी झाली आहे.
यामुळे केवळ भूभागाची हानीच होत नसून स्थानिक नागरिकांचे जीवित व मालमत्तेचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
अधिकारीच मिळून चालवतायत अवैध उत्खनन?
परिसरातील नागरिकांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, स्थानिक तलाठी व मंडलाधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत, उलट त्यांच्या मौनामुळे अवैध उत्खननाला संरक्षण मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. “तलाठीच देखील खनिज माफियासोबत संगनमतात आहेत,” असा आरोप संतप्त नागरिकांनी केला.
महसूल, पर्यावरण आणि सुरक्षेची मोठी हानी
अवैध उत्खननामुळे:
शासनाला महसुली तोटा
परिसरातील पर्यावरणीय संतुलन बिघडण्याचा धोका
स्फोटकांमुळे जीवितहानीची भीती
अवैध वाहतुकीमुळे रस्त्यांची हानी
या सर्व गंभीर समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
तातडीने कारवाईची मागणी
नागरिकांनी महसूल विभाग, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडे अवैध उत्खनन तत्काळ थांबवून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणावर दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.

संपादक : नागेश देडे





