मनसेच्या अल्टिमेटमनंतर पुणे मनपाकडून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू; नागरिकांनी व्यक्त केले समाधान
विश्रांतवाडी
भामा आसखेड प्रकल्पातून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांमध्ये गेल्या १५ ते २० दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती. या दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हेल्पलाइनवर तक्रारी नोंदवल्या. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. मात्र सुरुवातीला प्रशासनाकडून केवळ आश्वासन दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
यानंतर मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. “दूषित पाणी अधिकाऱ्यांना पाजू आणि मनसे स्टाईल आंदोलन करू” असा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली, असा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला.
यानंतर संबंधित भागांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रत्यक्ष तसेच सामाजिक माध्यमांद्वारे मनसेचे आभार मानल्याची माहिती देण्यात आली.

संपादक : नागेश देडे





