न्यायालयातून पळून गेलेला सराईत गुन्हेगार अनमोल जाधवराव अखेर जेरबंद
पुणे प्रतिनिधी : न्यायालयाने शिक्षा सुनावल्यावर न्यायालय परिसरातून पळून गेलेला पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार अनमोल अतुल जाधवराव (वय ३६, रा. महाराजा कॉम्पलेक्सजवळ, कोथरुड डेपो समोर, पुणे) अखेर पोलिसांच्या सापळ्यात सापडला आहे.
चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. ४०१/२०१२ भा.द.वि. कलम ३०७, आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) आणि मपोका कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी अनमोल जाधवराव याला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. मात्र, तो न्यायालय परिसरातून पळून गेला.
या घटनेबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११०/२०२५, बी.एन.एस. कलम २६२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. पळून गेलेला अनमोल जाधवराव हा नाशिक, मुंबई, सातारा, सांगली तसेच पुण्यातील पौंड, मुळशी व हवेली भागात वेगवेगळ्या वेषभूषेत वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
दि. ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अनमोल जाधवराव हा अहिल्यानगरहून वाघोलीकडे चारचाकी गाडीने येत आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळवून वरिष्ठांच्या सूचनांनुसार खांदवे नगर येथील कावेळी हॉटेल समोर सापळा रचण्यात आला.
एमएच ०४ ईएक्स ८२४४ या गाडीला पोलिसांनी थांबवून तपासणी केली असता गाडीत बसलेला इसम स्वतःचे नाव अनमोल अतुल जाधवराव असे सांगितले. त्याची ओळख पटवून त्यास अटक करण्यात आली.
सदर आरोपीवर यापूर्वीही पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) धनंजय पिंगळे, पोउपनि. अजित बडे, पोउपनि. प्रमोद पाटील, पोलीस अंमलदार दीपक चव्हाण, राजकिरण पवार, सचिन जाधव, दीपक रोमाडे, सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे, इसाक पठाण, तेजस चोपडे, दिनेश भोसले यांनी केली.

संपादक : नागेश देडे





