येरवडा पोलिसांची शिताफी – मकोका अंतर्गत फरार आरोपीस अटक
पुणे, दि. १२ नोव्हेंबर:
येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मकोका अंतर्गत फरार असलेल्या आरोपीस शिताफीने पकडून जेरबंद केले आहे. या प्रकरणात गु.र.नं. ४३६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८(२)(३)(५), भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(ब), १३५, क्रिमिनल लॉ (अमेंडमेंट) कलम ३, ७ आणि महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) कलम ३(१)(२), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपी अजय युवराज कसबे (वय २४, रा. भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) हा कारवाईनंतर फरार झाला होता. वरीष्ठांकडून आरोपीस तातडीने ताब्यात घेण्याच्या सूचना मिळाल्यानंतर, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे यांनी आरोपीचा वापरता मोबाईल क्रमांक शोधून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. आरोपी वारंवार मोबाईल आणि वास्तव्य बदलत असल्याने शोधमोहीम आव्हानात्मक ठरली.
दरम्यान, श्रेणी पोउनि प्रदीप सुर्वे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी पुणे-सोलापूर रोडमार्गे गावी पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यावरून तपास पथकाने सापळा रचून, आरोपी असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या वाहनाचा पाठलाग केला आणि त्यास शिताफीने अटक करण्यात आली.
आरोपीस पुढील चौकशीसाठी येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, पुढील तपास मा. सहायक पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे (येरवडा विभाग) या करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) श्री. सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे, व वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोउनि महेश फटांगरे, सहप्रभारी श्रेणी पोउनि प्रदीप सुर्वे, तसेच पोलीस अंमलदार शिंदे, कोकणे, वाबळे, जायभाय, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल आणि गायकवाड, निलख यांनी केली आहे.

संपादक : नागेश देडे





