बाणेरमध्ये अंमली पदार्थ विक्रीवर पोलिसांचा मोठा आघात; दोन जण अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुणे :- प्रतिनिधी – बाणेर परिसरात अंमली पदार्थ (गांजा) विक्री करणाऱ्या दोन इसमांना बाणेर पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १६.१२२ किलो गांजा व इतर साहित्य असा सुमारे ८,७६,४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती अलका सरग यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ज्युपिटर हॉस्पिटलजवळ (बाणेर, पुणे) येथे दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचला.
रात्री सुमारे १:३० वाजता, काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटारसायकलवर (एमपी ४६ एमडब्ल्यू २४१३) आलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपींची नावे
१) अभिषेक भिका बोरसे (वय २४)
२) अक्षय भिका बोरसे (वय २९)
अशी समोर आली आहेत.
त्यांच्याकडील लाल बॅगची तपासणी केली असता ३.०३४ किलो गांजा आढळून आला. पुढील तपासात त्यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता १३.०८८ किलो गांजा, इलेक्ट्रॉनिक काटा, चिकटपट्टी व इतर साहित्य असा सुमारे ६,५५,५१० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये एकूण १६.१२२ किलो गांजा व मोटारसायकलसह ८,७६,४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६८/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(च), २२(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश रायकर करत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपआयुक्त रजनिकांत चिलुमुला व सहाय्यक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
पोलीस प्रशासनाचा इशारा:
शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादक : नागेश देडे





