लोणी काळभोरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षांची शिक्षा
पुणे (प्रतिनिधी) – लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर गुन्ह्यात आरोपीस न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आरोपी सुनिल कोंडीबा जेधे (वय ४६, रा. भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे) यास २० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर घटना जानेवारी २०२० ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत घडली होती. आरोपीने अल्पवयीन मुलीला ड्रेस खरेदी करून देण्याच्या बहाण्याने उरुळी देवाची येथील लॉजवर नेऊन तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असतानाही हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ८८३/२०२० दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२)(एफ), ३७६ (२)(एन), ३७६ (३), ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ अंतर्गत कलम ३, ४(२), ५(एल), ५(एन), ६ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. पी. झिंजुर्के यांनी करून न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाचा खटला (स्पेशल सेशन केस क्र. ७०/२०२१) शिवाजीनगर सत्र न्यायालय येथे चालला.
सबळ पुरावे व साक्षीच्या आधारे मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी आरोपीस दोषी ठरवत वरील शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अरुंधती ब्रम्हे यांनी प्रभावी बाजू मांडली. कोर्ट पैरवी पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव व पोलीस अंमलदार अश्विनी पवार यांनी कामकाज पाहिले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे.

संपादक : नागेश देडे





