क्राईम

खंडणी मागणाऱ्या गुंडाला अवघ्या दोन तासांत अटक; पोलीस कर्मचारी प्रतिम जंगम यांची तत्पर कारवाई


पुणे, प्रतिनिधी : दरमहा ५ हजार रुपये हप्ता आणि दारूच्या ३ ते ४ बाटल्या मोफत देण्याची मागणी करत वाईन शॉप चालकाला धमकावून डोक्यात मोबाईल फेकून मारणाऱ्या आरोपीला लोहगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी प्रतिम जंगम यांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

अतुल गौतम ढोकरे (वय २५, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या इतर तिघा साथीदारांविरुद्धही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमितकुमार लखन तिवारी (वय ३२, रा. लेबर कॅम्प, लोहगाव) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ७ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लोहगाव येथील साठे वस्ती परिसरातील रोलेक्स वाईन शॉप येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतुल ढोकरे हा आपल्या साथीदारांसह दुकानात येऊन दादागिरी करत होता. घटनेच्या दिवशी त्याने “दरमहा ५ हजार रुपये रोख द्यायचे आणि दारूच्या बाटल्या फुकट द्यायच्या” अशी मागणी केली. विरोध केल्यावर त्याने धमकी देत मोबाईल फेकून मारला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला दुखापत होऊन तीन टाके घालावे लागले.

घटनेची माहिती मिळताच लोहगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि पोलीस कर्मचारी प्रतिम जंगम यांच्या शिताफीने अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *