पिंपरी-चिंचवडमध्ये अंमली पदार्थ निर्मिती युनिटवर धडक कारवाई; ६.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे प्रतिनिधी:-पिंपरी चिंचवड,
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थ मिश्रित भुकटी तयार करणाऱ्या युनिटवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ६,६३,००० रुपयांचा मुद्देमाल, मोबाईल, मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दि. १३ मार्च २०२६ रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत “मैफिल पान हाऊस” येथे करण्यात आलेल्या छाप्यानंतर पुढील तपास सुरू होता. त्याच अनुषंगाने १४ मार्च रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला आरोपी कैलास मांढरे हा अंमली पदार्थ मिश्रित भुकटी तयार करून विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत जांबेगाव ग्रामपंचायत मागील चैतन्य फूड गोदाम येथे सापळा रचून छापा टाकला. या वेळी आरोपी
कैलास दत्तात्रय मांढरे (वय ५४)
अनुराधा कैलास मांढरे (वय ५४)
दोघेही रा. आकुर्डी, पुणे
हे अंमली पदार्थ तयार करताना रंगेहात पकडले गेले.
या ठिकाणावरून अंमली पदार्थ मिश्रित पावडर, काळ्या रंगाचा द्रव पदार्थ, तीन मोबाईल, एक चारचाकी वाहन तसेच विविध मशीन असा एकूण ६.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई तीव्र; गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा

संपादक : नागेश देडे





