लोहगावात संत तुकाराम महाराज उत्सवानिमित्त जंगी कुस्ती आखाडा
पुणे प्रतिनिधी :- लोहगाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या उत्सवानिमित्त त्यांच्या पवित्र आजोळ असलेल्या लोहगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांसह भव्य आणि जंगी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले. पंचगावकरी सार्वजनिक रायबा तालीम ट्रस्ट, लोहगाव यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला कुस्तीप्रेमी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
थरारक अंतिम लढत; पृथ्वीराज पाटील विजेते
स्पर्धेतील अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. सिकंदर शेख आणि पै. पृथ्वीराज पाटील यांच्यात रंगली. जवळपास दीड तास चाललेल्या या थरारक लढतीने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली. अखेरीस खेळभावनेतून टॉसद्वारे निकाल लावण्यात आला आणि पै. पृथ्वीराज पाटील यांनी “संत तुकाराम महाराज केसरी – लोहगाव” हा मानाचा किताब पटकावला.
त्यांना मानाची चांदीची गदा आणि ₹२ लाखांचे पारितोषिक मा. उपसरपंच प्रितम खांदवे पाटील आणि रायबा तालीमचे अध्यक्ष पै. सोमनाथ मोझे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
इतर कुस्त्यांचे निकाल
द्वितीय क्रमांक : पै. दादा शेळके व पै. माऊली कोकाटे यांची कुस्ती बरोबरीत; ₹१.५ लाख पारितोषिक
तृतीय क्रमांक : पै. शुभम सिदनाळे व पै. वैभव माने यांची कुस्ती बरोबरीत; ₹९० हजार पारितोषिक
पुढील वर्षी बांधिस्त स्टेडियमची घोषणा
या कुस्त्यांचे पंच म्हणून आमदार बापूसाहेब पठारे यांनी जबाबदारी पार पाडली. ग्रामस्थांचा उत्साह आणि पारंपरिक कुस्तीला मिळणारा प्रतिसाद पाहता, पुढील वर्षी पूर्णपणे बांधिस्त स्टेडियम उभारण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
सनी फुलमाळी यांचा सत्कार
एशियन युथ गेम्स सुवर्णपदक विजेते पै. सनी सुभाष फुलमाळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास संत तुकाराम महाराज आजोळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम खांदवे पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेविका रेखाताई टिंगरे, तसेच अनेक पदाधिकारी, पंच, पैलवान आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक कलेला बळ
या भव्य कुस्ती स्पर्धेमुळे लोहगाव परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून पारंपरिक कुस्ती कलेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून साध्य झाले.

संपादक : नागेश देडे





