महत्त्वाचे

समाविष्ट गावांतील करप्रश्नावर महापौरांची तातडीची बैठक; नागरिकांच्या तक्रारींवर समिती स्थापन


पुणे प्रतिनिधी:- समाधान निकाळजे

पुणे शहरात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये वाढत्या कर आकारणीबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या विषयावर विशेष बैठक आयोजित करण्यात आली. पुणे महानगरपालिका वतीने महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक शिवाजीनगर येथील परिमंडळ क्र.२ कार्यालयात पार पडली.

या बैठकीस गटनेते काका चव्हाण, नगरसेवक सुभाष नाणेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. तसेच उपआयुक्त (कर आकारणी) रवी पवार उपस्थित होते. समाविष्ट गावांतील अनेक नागरिक, प्रतिनिधी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला मिळकतकर विभागाने समाविष्ट गावांमधील कर आकारणी संदर्भात सादरीकरण केले. यावेळी नागरिकांनी निवासी व व्यावसायिक मिळकतींवर जास्त कर आकारणी होत असल्याचा आरोप केला. शेजारील गावांचा ए.आर.व्ही. विचारात न घेता कर आकारणी केली जात असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत पद्धतीप्रमाणे कर आकारणी करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली.

नागरिकांनी पायाभूत सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसताना महानगरपालिकेच्या दराने कर आकारणी करणे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले. “ज्या सालचे घर त्या सालची कर आकारणी” या शासन आदेशाचे पालन होत नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. दंड, शास्ती आणि व्याजावर व्याज आकारणीबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

यावर अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले की, कर आकारणीचे धोरण महानगरपालिकेच्या मुख्य सभेने मंजूर केलेल्या ठरावांनुसार राबवले जात आहे. या धोरणात बदल करायचा असल्यास मुख्य सभेचा नवीन ठराव आवश्यक आहे.

बैठकीदरम्यान महापौर मंजुषा नागपुरे यांनी समाविष्ट गावांतील कर आकारणीचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित सभासदांची विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. नागरिकांनी आपल्या सूचना व मते लेखी स्वरूपात या समितीकडे द्यावीत, त्यानंतर प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विभागामार्फत संबंधित क्षेत्रांचे झोनिंगचे काम सुरू असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. या प्रक्रियेनंतर कर आकारणीच्या प्रश्नावरही योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

बैठकीच्या शेवटी गटनेते काका चव्हाण यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *