पुणे महानगरपालिके समोर भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी अन्नत्याग सत्याग्रह
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन २ मधील काही अधिकाऱ्यांवर कथित भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता एकता परिषद यांच्या वतीने दिनांक ९ मार्च २०२६ पासून पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणात कार्यकारी अभियंता विलास नवाळी, उपअभियंता राजेश खाडे, तात्कालीन उपअभियंता राहुल साळुंखे, तात्कालीन कनिष्ठ अभियंता निशिकांत छापेकर तसेच टी.डी.आर. सेलमधील आशालता साळवी यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून, या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
सत्याग्रहाचा आज दुसरा दिवस असूनही पुणे महानगरपालिकेतील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी येऊन भेट दिली नाही किंवा आंदोलनकर्त्यांची विचारपूसही केली नाही, अशी नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी हा लढा सुरूच राहणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

संपादक : नागेश देडे





