वडगावशेरीत विकासाचा वेग; बुद्ध विहार आणि सार्वजनिक शौचालय कामांना सुरुवात.
पुणे प्रतिनिधी : समाधान निकाळजे
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 2, श्रमिक वसाहत येथे दोन महत्त्वपूर्ण विकासकामांचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्राचे लाडके नेते स्वर्गीय मा. ना. अजितदादा पवार यांच्या विकास निधीतून तसेच माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे सुरू करण्यात आली.
परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्याबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत. यामध्ये सम्यक बुद्ध विहाराच्या उर्वरित बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. गौतम बुद्ध यांच्या करुणा, समता आणि शांततेच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि परिसरातील नागरिकांना एक हक्काचे उपासना केंद्र मिळावे, या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे.
त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक शौचालय दुरुस्तीच्या कामालाही प्रारंभ करण्यात आला. या कामामुळे परिसरात स्वच्छता वाढून सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.
प्रभागाचा भौतिक तसेच सांस्कृतिक विकास साधण्यासाठी पुढेही सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला नगरसेविका शितलताई सावंत, नंदिनीताई धेंडे, सुहासदादा टिंगरे आणि रवी टिंगरे यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

संपादक : नागेश देडे





