महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी औपचारिकपणे सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अखेर २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी औपचारिकपणे सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अखेर २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका २ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबरला पार पडणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि १७ नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. अंदाजे १ कोटी ७ लाखांहून अधिक मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतदार यादीतील नाव तपासणी आणि डुप्लिकेट नोंदी हटवण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
राज्यातील प्रभागरचना, आरक्षण आणि स्थानिक आघाड्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी पक्षीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्वतंत्र उमेदवारांचाही प्रभाव वाढताना दिसत आहे. निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने विशिष्ट मर्यादा निश्चित केल्या असून, यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
दरम्यान, ईव्हीएम यंत्रांची तपासणी, सुरक्षा यंत्रणेची आखणी आणि मतदान केंद्रांची अंतिम रूपरेखा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक तयारी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, या निवडणुका राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेला नवसंजीवनी देणाऱ्या ठरतील. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि पायाभूत सुविधा यांसारख्या मूलभूत विषयांवर मतदार आता थेट भूमिका मांडतील. त्यामुळे राज्यातील सर्वांचे लक्ष २ डिसेंबरकडे लागले आहे.

संपादक : नागेश देडे





