क्राईम

पोलिस दलावरचा जनतेचा विश्वास डळमळीत करणारी धक्कादायक घटना


पिंपरी-चिंचवड : पोलिस दलावरचा जनतेचा विश्वास डळमळीत करणारी धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रविवारी (2 नोव्हेंबर) मोठी कारवाई करत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय 35) याला तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या आशिलाविरुद्ध बावधान पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाचा तपास आरोपी उपनिरीक्षक चिंतामणी यांच्या ताब्यात होता. त्यांनी आरोपी व त्याच्या वडिलांना गुन्ह्यातून सुटका करून देण्यासाठी 46.50 लाख रुपयांची लाच मागितली.

 

तक्रारदाराने तत्काळ ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उघड केल्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि रविवारी प्रत्यक्ष लाच स्वीकारताना चिंतामणी यांना रंगेहात अटक केली.

 

या कारवाईनंतर पोलिस यंत्रणेमधील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

संपूर्ण शहरात या घटनेची जोरदार चर्चा असून, कायदा रक्षकच लाचखोर ठरल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एसीबीची ही धडक कारवाई भ्रष्टाचार्यांना धडा शिकवणारी ठरत आहे.

 


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *