डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या ॲड. अनिल मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कडून तीव्र निषेध!
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे शिल्पकार, भारतीय समाजव्यवस्थेत समानतेचे अधिष्ठान निर्माण करणारे महानायक यांच्या विरोधात ॲड. अनिल मिश्रा यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री. संतोष गायकवाड यांनी आज चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उत्तम भजनावळे यांची भेट घेत ॲड. अनिल मिश्रा यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
यावेळी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक. उत्तम भजनावळे साहेबांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिला आणि “या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.

संपादक : नागेश देडे





