पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशामुळे पुण्यातील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद
पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशामुळे पुण्यातील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंदपुणे : भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिनांक ५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशभरात उपलब्ध असलेले प्रोपेन व ब्यूटेन हे घटक प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
या आदेशाच्या पार्श्वभूमीवर गॅस उपलब्धतेमध्ये तात्पुरता तुटवडा निर्माण झाल्याने ५ मार्च २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत पुणे महानगरपालिका हद्दीतील गॅस आधारित दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
तथापि, बिबवेवाडी स्मशानभूमी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) मार्फत गॅस पुरवठा करण्यात येणाऱ्या दोन गॅस दाहिन्या सुरू राहणार आहेत. त्यामुळे धनकवडी आणि कात्रज परिसरातील नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी या दाहिन्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विद्युत दाहिनी आणि एपीसी (Air Pollution Control) प्रणालीवर आधारित यंत्रणा सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच वैकुंठ स्मशानभूमीतील तीन गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार असून तेथील पाच विद्युत दाहिन्या कार्यरत राहणार आहेत.
महापालिकेने नागरिकांना जवळच्या विद्युत दाहिन्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून वैकुंठ स्मशानभूमीवरील अतिरिक्त ताण कमी होईल.
विद्युत दाहिन्यांची ठिकाणे
येरवडा स्मशानभूमी – गुंजन चौक, नगर रोड
खराडी स्मशानभूमी – खराडी गाव
कैलास स्मशानभूमी – एस.एस.पी.एम.एस. मैदान जवळ, संगमवाडी
कोथरूड स्मशानभूमी – गुरुगणेश नगर
बाणेर स्मशानभूमी – औंध-बाणेर लिंक रोड
गंगानगर स्मशानभूमी – हडपसर
नागरिकांनी याची नोंद घेऊन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता (विद्युत) मनिषा शेकटकर यांनी केले आहे

संपादक : नागेश देडे





