ताडीवाला रोडची कन्या चंद्रिका पुजारी हिचे सुवर्णयश! बेहेरीनमध्ये आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

पुणे – महाराष्ट्रातील पुणे शहरातील ताडीवाला रोड या झोपडपट्टीतून अवघ्या दहा बाय दहाच्या खोलीतून उभ्या राहिलेल्या चंद्रिका पुजारी हिने आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावून देशाचा मान उंचावला आहे.
बेहेरीन येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 54 किलो वजनी गटामध्ये चंद्रिकाने दमदार कामगिरी करत उसबेगीजस्थानच्या खेळाडूवर विजय मिळवला. तिन्ही फेऱ्यांमध्ये आघाडी घेत तिने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. कोरियाच्या खेळाडूला नॉकआऊट करत, जपान आणि कझाकस्तानच्या खेळाडूंना ५–० ने हरवत तिने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
चंद्रिकाच्या या यशामागे तिच्या कुटुंबाची संघर्षकथा लपलेली आहे. वडील बोरुशी पुजारी हे एका खाजगी ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करतात, तर आई घरकाम व धुणे–भांडी करून घर सांभाळते.
ताडीवाला रोड भागात व्यसन आणि गुन्हेगारीपासून युवकांना दूर ठेवून खेळाकडे वळविण्याचा संकल्प सामाजिक कार्यकर्ते सचिन महादू शिंदे यांनी “युवा विकास मंच” या संस्थेच्या माध्यमातून केला. त्यांच्या प्रयत्नांतून स्थापन झालेल्या “युवा बॉक्सिंग अकॅडमी” मध्ये कोच जयंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रिकाने प्रशिक्षण सुरू केले.
अनेक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमक दाखवल्यानंतर चंद्रिकाची निवड स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) गोवा येथे प्रशिक्षणासाठी झाली. दोन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर तिची निवड आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ASI), पुणे येथे झाली. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली तिच्या खेळाला नवी धार मिळाली.
चंद्रिकाने यापूर्वी अबुधाबी आणि चीन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवले होते. यंदा तिने बहरीनमध्ये सुवर्ण पदक पटकावून देशाचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे.
सध्या चंद्रिका पुजारी पुण्यातील पूना कॉलेजमध्ये बारावीला शिकत असून तिने प्राथमिक शिक्षण सजनाबाई भंडारी विद्यालयात पूर्ण केले.हलाखीच्या परिस्थितीवर मात करून तिने घवघवीत यश संपादन केले आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुला-मुलींसाठी ती आज प्रेरणास्त्रोत ठरली आहे.

संपादक : नागेश देडे





