पुणे मनपा आयुक्तांच्या गाडीसमोर लोटांगण; कळस-धानोरी-लोहगाव भागातील प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे : कळस, धानोरी आणि लोहगाव परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सौ. पुजा धनंजय जाधव यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या गाडीसमोर लोटांगण घालून अनोखे आंदोलन केले.
सदर परिसरातील समस्या सोडविण्याबाबत वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनातील मुख्य मागण्या:
1. डीपी रस्ते अपूर्ण: 2008 साली आखण्यात आलेल्या डीपी प्लॅनमधील रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण न झाल्याने तात्काळ ती पूर्ण करावीत.
2. रस्त्यांची दुर्दशा: मुख्य आणि सिमेंट रस्ते वगळता बाकी सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
3. कचरा समस्या: दररोज किमान १०० ठिकाणी कचरा साचत असून, पालिकेकडून योग्य साफसफाई केली जात नाही.
4. पाणीटंचाई: साठे वस्ती, निंबाळकर नगर, मोझे नगर, पोरवाल रोड भागात दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.
5. अपूर्ण रस्ते कामे: डी वाय पाटील ते लोहगाव रस्त्याचे काम महिन्यांपासून अपूर्ण असून, नागरिकांना त्रास होत आहे.
6. अंतर्गत रस्ते नाहीत: प्रभागातील अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते अद्याप तयार झालेले नाहीत.
7. मयूर किलबिल प्रकल्पातील अनियमितता: विकासकांकडून नागरिकांच्या सुरक्षेची पायमल्ली होत असून, प्रशासन कारवाई करत नाही.
जागे व्हा, जागे व्हा – पुणे प्रशासन जागे व्हा! झोपलेल्या पालिका प्रशासनाचा निषेध असो!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आगामी काळात जर नागरिकांचे प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पुजा धनंजय जाधव यांनी दिला.

संपादक : नागेश देडे





