नायफड गावठाणात नागरिकांना वितरित तांदळात आळ्या; आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण – प्रशासनाकडून चौकशीची मागणी
नायफड गावठाण (ता. खेड) : शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना दिल्या जाणाऱ्या तांदळामध्ये आळ्या निघाल्याची संतापजनक घटना नायफड गावठाणात उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून “हा तांदूळ माणसाने खायचा की जनावराने?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
घरी नेल्यानंतर नागरिकांनी जेव्हा तांदूळ स्वच्छ धुण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणात आळ्या, किडे आणि दुर्गंधी आढळून आली. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. “आम्ही सरकारी रेशनवर अवलंबून आहोत. पण अशा तांदळामुळे आमच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” असे ग्रामस्थांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, काही दिवसांपासून रेशन दुकानातील धान्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट आहे. पण यावेळी परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. “आम्ही हा तांदूळ खाल्ल्यानंतर जर आमच्या आरोग्याला काही नुकसान झाले, तर जबाबदार कोण?” असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत ग्रामपंचायत, तालुका अन्न वितरण अधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांना लेखी तक्रार देण्याची तयारी सुरू केली आहे. दोषींवर तातडीने कारवाई करून संबंधित दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाने तातडीने या तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठवून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून जबाबदार अधिकाऱ्यांवर व दुकानदारावर कारवाई करण्याची गरज आहे.

संपादक : नागेश देडे





